अबाऊट टर्न : ओळख

“”काय… ओळखलंत का?” या प्रश्‍नावर आता बंदीच घातली पाहिजे. एकतर सगळी शहरं “मास्को’ झालीत. समोर अचानक येऊन उभा ठाकणारा माणूस जेव्हा हा प्रश्‍न विचारतो, तेव्हा त्याचे फक्‍त डोळे दिसत असतात आणि त्या डोळ्यात एक प्रकारचा संशय दिसत असतो. तो संशयसुद्धा आम्ही एकवेळ गृहीत धरू. पण आम्हाला अशा वेळी वेगळाच प्रश्‍न पडतो.

आपल्याही तोंडावर मास्क असताना यानं आपल्याला ओळखलं कसं? मग लक्षात येतं की आपली केसांची ठेवण चटकन ओळखता येण्याइतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मग आम्ही निर्धार करतो, की लोकांना केसांच्या ठेवणीवरून ओळखण्याची कला आत्मसात करायची. दोन-तीनदा प्रयत्नही करून पाहिला; पण जमलं नाही. कारण केशरचना एकसारखी असणारी माणसं बरीच असतात. काही वेळा कपड्यांवरून अंदाज बांधण्याचाही प्रयत्न केला. तोही चुकला; कारण पूर्वीही आमचं लोकांच्या कपड्यांकडे इतकं बारकाईनं लक्ष कधीच नसायचं.

लोकांकडे बारकाईने बघण्याची सवयच आपण कधी लावून घेतली नाही, याचं आता वैषम्य वाटतंय. पूर्वी असे नामुष्कीजनक प्रसंग कुणाच्यातरी लग्नाच्या मांडवात यायचे. आता रस्त्यावरही येऊ लागलेत. “”किती बदल झालाय तुमच्यात,” म्हणून वेळ मारून न्यावी तर समोरचा माणूस रोजच्या बघण्यातला असतो. एकुणात “ओळख’ हा मानवी जीवनाचा किती अविभाज्य घटक आहे आणि त्यात दृष्य ओळखीलाच सर्वाधिक महत्त्व आहे, हे पदोपदी जाणवतंय.

तसं पाहायला गेलं तर ओळख अनेक प्रकारची असते; पण ग्रामीण भागात सध्या वेगळाच “आयडेन्टिटी क्रायसिस’ अनेकांना भेडसावतोय, याची एक कहाणी कालच एका खेड्यातल्या मित्रानं फोनवरून सांगितली. गावपातळीवर भावकी, गावकी अशी अनेक प्रकारची “ओळख’ माणसाला चिकटलेली असते. जातीची ओळख तर असतेच. बऱ्याचदा शहरातसुद्धा ती पिच्छा सोडत नाही; परंतु “राजकीय ओळख’ हा नवाच फंडा मित्राकडून ऐकायला मिळाला. शहरांमधून गावी जायला सरकारने परवानगी दिल्यानंतर बरीच माणसं आपापल्या घरी परतू लागली. पण त्यातले काहीजण घरी आणि काहीजण शाळेत जाताहेत, अशी माहिती या मित्राने दिली.

ग्रामपंचायतीची सत्ता ज्या पार्टीच्या ताब्यात, त्या पार्टीतली माणसं “होम क्‍वारंटाइन’ आणि विरुद्ध पार्टीची असतील तर ती गावच्या शाळेत… ही माहिती आम्हाला खरी वाटली नाही आणि खरी असेल, तर हे गाव “अपवादात्मक’ ठरावं, अशी प्रार्थना करूया. कारण आमच्या माहितीनुसार, पंचायती राज संकल्पनेत गावपातळीवरच्या निवडणुका पक्षचिन्हांवर अपेक्षित नाहीत. अर्थात, तरीसुद्धा वेगवेगळे राजकीय पक्ष आपल्या ताब्यात ग्रामपंचायती किती, आपल्या पक्षाचे सरपंच किती, याची आकडेवारी जाहीर करत असतात, हा भाग वेगळा! पण सध्याच्या परिस्थितीत राजकारण “क्‍वारंटाइन’ करायला नको का?

बाह्यरूपावरून पटणाऱ्या ओळखीपासून या राजकीय ओळखीपर्यंत अनेक प्रकारची ओळख आपण तयार केली; मिरवली. करोनाच्या संकटानंतर जग बदललेले असेल, असं आजकाल बोललं जातंय. या बदलांमध्ये माणसाच्या काही ओळखी कायमच्या पुसल्या जाणं आपल्याला अपेक्षित आहे? ज्या ओळखीचं रूपांतर स्नेहात, प्रेमात, नात्यात होतं तेवढीच ओळख शिल्लक राहिली तर? हातावर क्‍वारंटाइनचा शिक्‍का मारल्यावर अनेकांना वाईट वाटलं; पण आपल्या व्यक्‍तिमत्त्वावर अनेक प्रकारच्या ओळखींचे शिक्‍के वर्षानुवर्षे मारले गेलेत, त्याचं काय?

– हिमांशू

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.