– हिमांशू
एखाद्या युद्धातून माघार घ्यावी लागणं आणि करारमदार वगैरे करून रीतसर सैन्य मागे घेणं, यात मूलभूत फरक असायला हवा की नाही? किमान, पराभवाच्या भीतीनं जेव्हा एखादं सैन्य रणांगणातून पळ काढतं तेव्हाची परिस्थिती आणि करारानुसार फौजा मागे घेण्याची प्रक्रिया या दोन भिन्नभिन्न गोष्टी आहेत, असं वाटत होतं. अमेरिकेच्या सैन्यानं अफगाणिस्तानातून गाशा गुंडाळला, तो एक “धोरणात्मक निर्णय’ होता.
म्हणजे अमेरिकेचे सैनिक आपापल्या बॅगा भरून, आपापल्या चीजवस्तू सोबत घेऊन घरी जातील, असंच चित्र किमान आम्हाला तरी दिसलं होतं. सामानसुमान राहू द्या; किमान आपापली शस्त्रं तरी सोबत घेऊन जायला हवं होतं की नाही? जणू काही आपण पराभवाच्या गडद छायेत आहोत आणि शत्रू आपल्या मागे लागलाय, अशी स्थिती असताना सैनिक जसे शस्त्रं खाली टाकून पळ काढतात, तशी परिस्थिती अफगाणिस्तानात उद्भवल्याचं काही ऐकिवात नाही.
मग अमेरिकी फौजांची अत्याधुनिक शस्त्रास्त्रं अफगाणिस्तानात राहिलीच कशी? तीही एवढ्या प्रचंड संख्येनं? प्राप्त माहितीनुसार, तब्बल साडेआठ लाखांहून अधिक अमेरिकी शस्त्रास्त्रं अफगाणिस्तानात “राहून गेलीत’! आश्चर्य म्हणजे शस्त्रास्त्रांचं नव्हे तर चिलखती वाहनं आणि त्याहून आश्चर्य म्हणजे लढाऊ विमानंसुद्धा परक्या भूप्रदेशात “राहून जात’ असतील, तर अशा देशाला “महासत्ता’ का म्हणायचं, हाच प्रश्न पडणार नाही का? पण अगदी हेच घडलंय!
अमेरिकी लष्कराकडे आहेत तशी अत्याधुनिक आयुधं, वाहनं, विमानं, रणगाडे आदी सामग्री आपल्याला मिळावी म्हणून कितीतरी देश अक्षरशः तळमळत असतात आणि दुसरीकडे अमेरिकी सैनिक साडेआठ लाख शस्त्रं “विसरून’ घरी जातात, हे काही पटण्याजोगं नाही. “हमवी’ नावाची अमेरिकी चिलखती वाहनं आता तालिबान्यांच्या ताब्यात आहेत आणि त्यातून ते फिरताहेत. त्यांच्या हातात अमेरिकी लष्कराच्या “एम-16′ रायफली दिसताहेत.
याव्यतिरिक्त मोर्टार लॉंचरसारखी शस्त्रंही तालिबान्यांना मोठ्या संख्येने मिळालीत. अमेरिकेचे ए-29 हे लढाऊ विमान आणि “ब्लॅक हॉक’ हे हेलिकॉप्टरसुद्धा तालिबान्यांच्या हाती कसं लागलं, हा प्रश्न जगाला नव्हे तर अमेरिकी सिनेटर्सनासुद्धा पडलाय. नाइट व्हिजन, संदेशयंत्रणा, टेहळणीची साधनं अशा लष्करी उपकरणांचंही मोठं घबाड तालिबान्यांच्या हाती लागलंय आणि ते सगळं “मेड इन अमेरिका’ आहे.
अमेरिकेनं केवळ सैन्य मागे घ्यायचं, शस्त्रं मागे घ्यायची नाहीत, असा करार होता की काय? कारण तोफा वगैरेही परत नेलेल्या नाहीत. बाकी सगळं जाऊ द्या! साडेआठ लाख लहानमोठ्या शस्त्रांची, विमानांची, हेलिकॉप्टरची, उपकरणांची किंमत किती असेल, हा टिपिकल मध्यमवर्गीय प्रश्न आमच्यासारख्याला पडणार की नाही? आधीच युद्धावर अब्जावधींचा खर्च झालाय. त्यात हा “विसराळूपणा’! तोही “आर्थिक महासत्ता’ म्हणवून घेणाऱ्यांकडून..?
तालिबान हे “अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचंच अपत्य’ असल्याचं मानणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्याच्यासाठी तर ही “खेळणी’ तिथंच ठेवून अमेरिका परतली नसेल ना? काहींच्या मते, तालिबान्यांना जे घबाड सापडलंय, ते वापरण्याची तांत्रिक बुद्धी त्यांच्याकडे नाही. परंतु काहींच्या मते, ते हे घबाड विकू शकतात किंवा त्याच्या वापराचं प्रशिक्षण घेऊ शकतात. ग्रेनेड, मशीनगन, रॉकेट लॉंचर ते चालवू शकतातच. पण मुख्य मुद्दा असा, की हे सगळं “विसरलं’ कसं?