नवी दिल्ली: करोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने सर्व परिमंडळे, उत्पादन विभाग आणि सार्वजनिक क्षेत्र उपक्रम यांच्यामार्फत 7 एप्रिलपर्यंत एकूण 5,82,317 पुनर्वापर करता येणारे मास्क तसेच 41,882 लिटर हॅंड सॅनिटायझर्सची निर्मिती केली आहे.
अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी रेल्वेची मालवाहतूक सेवा आठवड्याचे सातही दिवस 24 तास सुरू आहे. कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी फेस कव्हर आणि हॅंड सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कंत्राटी कामगारांनाही या सुविधा पुरविल्या जात आहेत. रेल्वे कार्यशाळा, प्रशिक्षण आगार आणि रुग्णालये स्थानिक पुरवठा करण्यासाठी स्थानिक पातळीवर सॅनिटायझर्स आणि मास्कची निर्मिती करीत आहेत.
स्थानिकांच्या कल्पनेतून साकारलेली नळाला हात न लावता हात धुण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक अंतराच्या नियमांसंदर्भात रुळांवर काम करणारे कर्मचारी आणि मालवाहू गाडीचे चालक यांच्यात जागृती निर्माण करण्याचे काम सातत्याने सुरु आहे.