चंडिगढ – आम आदमी पक्षाने (आप) चंडिगढ महापौरपद निवडणूक निकालावर आक्षेप घेत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली. आधीचा निकाल रद्दबातल ठरवून नव्याने निवडणूक घेण्याची मागणी आपच्या याचिकेतून करण्यात आली आहे.
आप आणि कॉंग्रेसने महापौर, उपमहापौरपदांच्या निवडणुकीसाठी आघाडी केली. मात्र, महापौर निवडणुकीत आपच्या उमेदवाराला भाजपच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला. त्या निकालावर आक्षेप घेत आप आणि कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी पालिका सभागृहात गदारोळ केला. त्यांनी पुढील टप्प्यातील वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौर या दोन पदांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे त्या पदांसाठी भाजप उमेदवारांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्या सर्वच निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेऊन आपने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे बनाव आणि फसवणूक होती.
पीठासीन अधिकाऱ्याने मतपत्रिकांमध्ये फेरफार केला, अशा आरोपांची सरबत्ती आपच्या याचिकेतून करण्यात आली. मंगळवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेच्या व्हिडीओ चित्रिकरणाचे आणि मतपत्रिकांशी संबंधित रेकॉर्डचे जतन केले जावे. निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली नव्याने निवडणूक घेतली जावी, अशा मागण्याही त्या याचिकेत करण्यात आल्या आहेत.