चंदीगड – पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या असतानाच कॉंग्रेस आणि भाजपला मात्र मोठा झटका बसला आहे. चंदीगड महापालिकेच्या निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने सर्वाधिक जागा जिंकून कॉंग्रेस-भाजपला मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे चंदीगड महापालिकेतील यश मिळाल्याने सर्वच प्रस्थापित पक्षांचे धाबे दणाणले आहेत.
चंदीगड महापालिकेसाठी 24 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. पालिकेच्या 35 जागांसाठी 203 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीचे आज निकाल जाहिर करण्यात आले. या निवडणुकीत 14 जागा जिंकून आप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत भाजपने 12 जागा जिंकल्या आहेत. तर सत्ताधारी कॉंग्रेसला केवळ 8 आणि अकाली दलाला एकच जागा मिळाली आहे.