पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या वतीने शुक्रवारी भाजपच्या डीपी रस्त्यावरील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
आप सह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे आपचे नेते मुकुंद किर्दत यांच्यासह आपचे शहर पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्याचे पडसाद पुण्यातही उमटले. पोलिसांकडून सकाळपासूनच भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतरही आपचे कार्यकर्ते कार्यालयासमोर बसून जोरदार घोषणाबाजी करत होते. काही वेळाने पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, सायंकाळी उशीरा त्यांना सोडून देण्यात आले.