माद्रिद – आधुनिक जगामध्ये पती आणि पत्नी दोघेही नोकरी करत असतात या पार्श्वभूमीवर घरकाम कोणी करायचे आणि किती प्रमाणात करायचे यावरून सतत वादविवादही होत असतात. याच समस्यावर तोडगा काढण्यासाठी स्पेन सरकारने एक अनोखे ॲप विकसित केले असून या ॲपद्वारे पती आणि पत्नी यांच्या घरकामावर नजर ठेवली जाणार आहे.
साधारणपणे पती घर कामात अजिबात योगदान देत नाही, अशी पत्नीची तक्रार असते म्हणूनच ह्या ॲपच्या माध्यमातून पतीने घर कामामध्ये किती योगदान दिले आहे हे कळू शकणार आहे. या ॲपच्या माध्यमातून पत्नी तक्रारही करू शकणार आहे. या ॲपच्या माध्यमातून फक्त पतीच्या घरकामातील योगदानावर नजर ठेवली जाणार नसून पत्नी आणि घरातील इतर सदस्य यांच्या योगदानाचाही विचार केला जाणार आहे. सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून स्पेन सरकारने हे ॲप विकसित केले आहे.
स्पेनच्या नॅशनल स्टॅटिस्टिकस इन्स्टिट्यूटने नुकत्याच केलेल्या सर्वेतील निष्कर्षाप्रमाणे पती आणि पत्नी या दोघांनीही आपणच जास्त प्रमाणात घरकाम करत असल्याचा दावा केला होता. याच पार्श्वभूमीवर स्पेन सरकारने हे ॲप विकसित केले आहे. ॲपमध्ये घरात दररोज केल्या जाणाऱ्या प्रत्येक कामासाठी साधारण किती वेळ लागू शकतो आणि संबंधित सदस्याने त्यासाठी किती वेळ घेतला याची नोंद सुद्धा केली जाणार आहे.
पती-पत्नी आई-वडील मुले या सर्वांना कशाप्रकारे कामाचे विभाजन करता येईल याचा विचारही या ॲपमध्ये करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पत्नी घरात करत असलेल्या कामाच्या बदल्यात तिला नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारचे अनेक निकाल स्पेनमधील विविध न्यायालयानी दिले असल्याने त्याचाही विचार करून स्पेन सरकारने हे ॲप अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे गृहिणीच्या ज्या कामांची मोजमाप होत नाही, त्याची नोंद सुद्धा या ॲपच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस हे ॲप स्पेन मध्ये सर्वत्र लागू करण्याचा विचार स्पेन सरकार करत आहे. स्पेनच्या जेंडर इक्वलिटी मंत्री अँजेला रोड्रिक्स यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.