वॉशिंग्टन – खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याच्या हत्येचा कट अमेरिकने (America) उधळून लावल्याचा दावा ब्रिटनमधील एका वर्तमानपत्राने केला आहे. अमेरिकेच्या भूमीवरच पन्नूची हत्या करण्याचा कट केला गेला होता, असेही या वृत्तामध्ये म्हटले गेले आहे. मात्र या कटाचा तपशील या वृत्तामध्ये देण्यात आलेला नाही.
हा कट उधळून लावण्यात अमेरिकेतील “एफबीआय’ ही तपास यंत्रणा सहभागी होती का नाही, हे देखील स्पष्ट केले गेलेले नाही. पन्नूच्या हत्येच्या कटाबाबत अमेरिकेने भारताला कळवले असल्याचेही या वृत्तामध्ये म्हटले गेले आहे. मात्र अमेरिकेकडून या संवादाची माहिती उघड केली गेलेली नाही.
अलिकडेच नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि ऍन्टनी ब्लिंकेन या दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये याविषयी काही चर्चा झाली नव्हती. मात्र “एफबीआय’ने न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात एका व्यक्तीविरोधात या हत्येचा कट केल्याबाबतची कागदपत्रे सादर केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. मात्र “एफबीआय’ने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
पन्नू हा “सिख फॉर जस्टीस’ या बंदी घातलेल्या संघटनेचा सस्थापक आहे. त्याने अलिकडेच एक व्हिडीओ संदेश प्रसिद्ध करून शिखांनी 19 नोव्हेंबर आणि त्यानंतर एअर इंडियाच्या विमानांमध्ये बसू नये असे आवाहन केले होते. जगभरात प्रवास करणाऱ्या एअर इंडियाच्या विमानांना लक्ष्य केले जाणार असल्याचेही त्याने या व्हिडीओमधून म्हटले होते. पन्नूने अशाप्रकारची धमकी पहिल्यांदाच दिलेली नाही.
यापूर्वी सप्टेंबरमध्ये त्याने कॅनडामधील हिंदूंना कॅनडा सोडून जाण्याची धमकी दिली होती. खलिस्तानी म्होरक्या हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारत सहभागी असल्याचे आरोप आणि उच्चस्तरिय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या मुद्यांमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर त्याने ही धमकी दिली होती. कॅनडामध्ये घेण्यात आलेल्या सार्वमताच्या पार्श्वभुमीवर कॅनडातील सरे येथे झालेल्या खलिस्तानवाद्यांच्या रॅलीमध्येही पन्नू सहभागी झाला होता.