लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा नगरपरिषदेच्या कुमार रिसॉर्ट जवळ असलेल्या वाहनतळातील एक झाड धोकादायक झाले असून, ते केव्हाही कोसळू शकेल आशा स्थितीत उभे आहे. हे झाड खोडाच्या बुंध्याशी जळून गेले असून केवळ लहानसा धक्का किंवा जोराचा वारा हे उभे झाड जमिनीवर पडू शकते. त्यामुळे येथे अपघाताची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कुमार रिसॉर्टच्या जवळ मुख्य रस्त्याला लागून असलेल्या वाहनतळात मोठ्या प्रमाणावर येथे येणाऱ्या पर्यटकांची तसेच अनेकदा स्थानिकांची वाहने उभी असतात. बऱ्याचदा याठिकाणी पर्यटक झाडाच्या सावलीला किंवा वाहन पार्क करेपर्यंत, किंवा पार्किंगमधून वाहन बाहेर काढेपर्यंत उभे राहतात. हे झाड पडल्यास पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान हाऊ शकते.
तसेच कोणी व्यक्ती त्यावेळी त्याठिकाणी असेल तर त्यांच्याही जीवावर देखील बेतू शकते. शिवाय हे झाड मुख्य रस्त्याच्या बाजूला पडले तर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा गंभीर अपघात होऊ शकतो. त्यामुळे नगरपरिषदेकडून हे झाड तात्काळ काढून टाकण्याची आवश्यकता आहे.
शहराच्या विविध भागात भीक मागून, तसेच फुगे विकून गुजारणा करणारे अनेजकण रात्रीच्या वेळी मोकळ्या झालेल्या या वाहनतळाचा आसरा घेतात. तेथेच चूल पेटवून ते जेवण बनवितात. अशाच प्रकारामुळे या झाडाचा बुंधा जळाला असल्याचे काही प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. शिवाय हा प्रकार आणि झाडाची अवस्था नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेली असतानाही त्यावर काही कार्यवाही झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.