करोना तपासणी केंद्रावर नागरिकांचा धुमाकूळ, स्वॅब सॅम्पल फेकले

पुण्यात आंबेगाव परिसरातील प्रकार : दोन महिलांविरुद्ध भारती पोलीस ठाण्यात तक्रार

पुणे  – कोविड टेस्टिंग सेंटरमधील टेस्ट किट संपले म्हणून संतप्त नागरिकांनी सेंटरमध्ये अक्षरश: धुमाकूळच घातला. केवळ शाब्दिक वादावादी न करता नागरिकांचे घेतलेले स्वॅब टेस्टचे किट खाली फेकून देऊन तोडफोड केली. आंबेगाव बुद्रुक येथील लक्ष्मीबाई हजारे वस्तीगृहात मंगळवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

 

करोना संशयित नागरिक याठिकाणी स्वॅब सॅम्पल देण्यासाठी आले होते. येथील अधिकाऱ्यांनी दुपारी टेस्ट किट संपल्याचे सांगत, “उद्या या’ असे नागरिकांना सांगितले. हे ऐकून बराच वेळ रांगेत उभे राहिलेले नागरिक संतापले. त्यांनी सेंटरवर कार्यरत अधिकाऱ्यांबरोबर वाद घालण्याला सुरूवात केली. या वादाचे रुपांतर तोडफोडीत झाली. टेबलावर अनेक नागरिकांचे स्वॅप सॅम्पल्सच्या ट्युब्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्या सगळ्या संतप्त नागरिकांनी फेकून दिल्या, तसेच टेबलाला लाथा मारून त्यावरील सगळे साहित्य जमिनीवर पाडले. त्यामध्ये काही करोना पॉझिटिव्हचे पण सॅम्पल असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

गोंधळ घालणाऱ्या शिवानी श्रीकांत उगले आणि प्रीतम संजय बोद्रे (रा. आगम जैन मंदिर औंदुबर सोसायटी, सच्चाई माता आंबेगाव खु.) यांच्याविरुद्ध महापालिकेतील आरोग्य निरीक्षक नितीन रघुनाथ राजगुरू (वय 45, रा. सुप्पर-अप्पर इंदिरानगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

लक्ष्मीबाई हजारे वसतीगृहात करोनाची स्वॅब सॅम्पल घेण्याचे काम सुरू होते. दुपारी पावणे एक वाजण्याच्या दरम्यान दोघा आरोपींनी “आमची चाचणी आधी घ्या’ अशी मागणी केली. त्यावेळी “महापालिका कर्मचाऱ्यांच्या रांगेतील दोन आणि सर्वसामान्य नागरिकांमधील दोन अशाप्रकारे दोन्ही मिळून चाचणी होणार आहे. त्यामुळे तुम्ही रांगेत थांबा’ असे आरोपींना सांगण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

त्यावेळी “आमची चाचणी आधी करा, नाहीतर आम्ही कोणाचीच होऊ देणार नाही. तुम्ही काय करत ते बघतोच’ असे म्हणून चाचणी करण्यासाठी ठेवलेले साहित्य, चाचणी किट, पॉझिटिव्ह पेशंटचे सॅम्पल असलेले किट दोघींनी उधळून लावले. तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान करून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली असे तक्रारीत नमूद केले आहे.

कोविड पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या स्वॅबच्या नमुन्यांच्या नमुन्यांचे नुकसान केले, शिवाय ते जमिनीवर पाडल्याने कोविड आजाराचा संसर्ग वाढवण्याला कारणीभूत ठरल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

घटनास्थळी भारती विद्यापीठाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांनी भेट दिली. या प्रकरणी कवठेकर पुढील तपास करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.