बळीराजाच्या जीवावर घाव

पुणे  -जिल्ह्यातील बारामती, खेड, जुन्नर, पुरंदर, आंबेगाव, दौंड, इंदापूर, शिरुरमध्येही कांदा पडून आहे. तो सध्या सडून चालला आहे. त्यामुळे निर्यातबंदीचा घाव कांदा उत्पादकांच्या जीवावर बसला आहे. त्यामुळे निर्यातबंदी विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. गेल्या वर्षीही केंद्र सरकारने असेच गळचेपी धोरण राबवून पाकिस्तानचा कांदा आयात केला होता. त्यावेळीही शेतकरी दरामध्ये चिताड मेला होता.

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी (दि. 14) कांद्यावर निर्यात बंदी लादली आहे. करोना काळात गेल्या काही महिन्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात झाला आहे. देशातील कांद्याच्या दरांमध्ये झालेली वाढ थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात झाला आहे. भारताने एप्रिल ते जून या कालावधीत 19.8 कोटी डॉलर किंमतीचा कांदा निर्यात केला.

भारतातून बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका या देशांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात होतो.गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात वाढ होत आहे. कांद्याच्या प्रति किलो दरांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात नागरीकांना कांदा 45 ते 50 रुपये प्रति किलो या दराने मिळत होता.

देशभरातच हे दर वाढले आहेत. कांद्याचा घाऊक दर 26 रुपये ते 37 रुपये प्रति किलो इतका होता. कांद्याला नुकताच चांगला बाजारभाव मिळत होता, तोच सरकारने निर्यातबंदी लादल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्‍त होत आहे. निर्यातबंदी होताच राज्यातील बाजारपेठेत कांद्याचे दर कमी झाले आहेत. बाजारात कांद्याचे दर तीन हजार रुपये किंवटलपर्यंत गेले होते.

परंतू या निर्णयामुळे आत्ता कांदा 5 ते 10 रुपये किलोवर येणार हे मात्र नक्‍की. याबाबत केंद्र सरकारने शेतकरीहिताचा निर्णय घेण्याबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे. आधीच करोनाच्या संकटाने हतबल झालेल्या बळीराजाच्या चिंता आता पुन्हा वाढल्या आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.

लागवड केलेल्या कांद्याची होणार माती
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सध्या महागडे बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. तर काही शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी सुरू आहेत. आत्ता लागवड केलेला महागडा कांदा पुढील तीन महिन्यांत मातीमोल दराने विकावा लागणार हे मात्र नक्‍की. या शेतकऱ्यांचा बियाणांचा खर्च तर सोडाच पण मजुरी, औषध फवारणी, उत्पादन खर्चही निघेल की नाही अशी शंका आहे.

सध्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे बाजारात येणाऱ्या कांदा उत्पादकांची संख्या रोडावली आहे. कांद्याचा दरही 180 ते 260 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. शेतकऱ्यांनी 3 हाजार ते 4 हजार रुपये दराने बियाणे घेऊन कांदा लागवड केली आहे. हा लागवड केलेला कांदा पावसामुळे वाहून गेला तर काही ठिकाणी रोपे नष्ट झाली आहेत. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. याबाबत केंद्र सरकारने शेजारी पाजारी न जगवता शेतकरी जगवण्यासाठी प्राधान्य द्यावे.
– बाळासाहेब बाणखेले, संचालक, मंचर बाजार समिती.

Leave A Reply

Your email address will not be published.