मंचर, (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव लवकरच जाहीर होईल. महायुतीच्या तिन्ही पक्षाचा कार्यकर्त्यांनी उमेदवाराला विक्रीमी मतांनी निवडून देण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे पोलीस अधिकारी व अंमलदार निवासस्थान बांधकामाचा उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक रमेश चोपडे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी. एन. बहिर, कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील, सहायक निरीक्षक किरण भालेकर, उपअभयंता सुरेश पठाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, पोलीस निवासस्थानाची इमारत अतिशय सुंदर झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात झाडे लावा संपूर्ण वसाहतीत झाडांनी झाकून टाका, परिसर स्वच्छ ठेवा असे आवाहान त्यांनी पोलिसांना केले. नुकतेच जिल्ह्यातील पोलिसांसाठी चार कोटी रुपयांच्या नवीन गाड्या दिल्या आहेत.
पोलिसांना दररोज अनेक अडचणींना तोंड देत ड्युटी करायला लागते. पोलिसांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आमचे सरकार लक्ष घालत असून घोडेगाव पोलीस कर्मचार्यांच्यासाठी झालेल्या निवासस्थानाप्रमाणे निवासस्थाने उभारण्याचे काम या सरकारने हाती घेतले असल्याचे त्यांनी नमूद केले.
125 कोटींच्या कामांचा शुभारंभ
घोडेगाव ग्रामीण रुग्णालय बांधकाम करणे, घोडेगाव बस स्थानक बांधकाम करणे, घोडेगाव येथे आदिवासी मुलींसाठी वसतिगृहचे बांधकाम करणे, आदर्श आश्रम शाळा तयार करणे इत्यादी 125 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.