मुख्यमंत्री कमलनाथ शीलान्यासासाठी स्वत: हजेरी लावणार
भोपाळ : सध्या देशात छपत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून राजकारणाने जोर धरला आहे. त्यातच मध्य प्रदेशातल्या छिंदवाडामध्ये अतिक्रमण हटाव मोहीमेत ज्या चुकीच्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला होता. त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींकडून रोष व्यक्त करण्यात येत होता. या प्रकरणी महाराष्ट्रातले कॉंग्रेस नेते राजीव सातव, मंत्री सुनील केदार यांनी तातडीने हा विषय कमलनाथ यांच्या कानावर घातल्याने आता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणाहून हा पुतळा हटवण्यात आला होता, तिथेच योग्य जागेवर शिवरायांच्या पुतळ्याची पुन्हा विधीवत स्थापन होणार असून त्या स्मारकाच्या शीलान्यासासाठी स्वत: मुख्यमंत्री कमलनाथ हजर राहणार आहेत.
अतिक्रमणाच्या दरम्यान कारवाई करताना अधिकाऱ्यांनी किमान महापुरुषांच्या सन्मानाला तडा जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी होती, त्यामुळे याबाबत अधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबतही चौकशी होणार असल्याचं मंत्री सुनील केदार यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले.
छिंदवाडा जिल्ह्यातल्या सौसरमध्ये 11 फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास ही अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यात जेसीबीच्या साहाय्यांना महाराजांचा पुतळा हटवण्यात आला होता. या कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरु लागल्यानंतर त्याबद्दल महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होत होता. भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही याबाबत कॉंग्रेसवर टीका केली होती.