“कस्टमाईज गिफ्ट’ची क्रेझ : तरुणाईकडून “स्पेशल सेलिब्रेशन’
पुणे – जगभरात प्रेम व्यक्त करण्यासाठी “व्हॅलेंटाइन डे’ मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. विशेषत: तरुणाईकडून यानिमित्ताने “स्पेशल सेलिब्रेशन’ करण्यात येते. “रोज डे’पासून व्हॅलेटाइन वीकला सुरुवात होते. या “वीक’मधील शेवटचा दिवस असणाऱ्या “व्हॅलेटाइन डे’चे तरुणाईला वेध लागलेले असतात.
“व्हॅलेंटाइन डे’चे स्वागत करण्यासाठी बाजारपेठाही सजलेल्या आहेत. या प्रेमाच्या उत्सवानिमित्त आवडीच्या व्यक्तीला देण्यासाठी “कस्टमाईज गिफ्ट’ला प्राधान्य देण्याला पसंती देण्यासह एकमेकांबरोबर वेळ घालवण्याकडे कल असतो. तर “व्हॅलेटाइन डे’च्या निमित्ताने संगीत, नृत्य, शायरी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांच्या तिकिटांमध्ये जोडप्यांच्या तिकिटावर विशेष सवलत देण्यात येते. या निमित्ताने आवडत्या व्यक्तीला खास सोशल मीडियावर खास स्टिकर्सदेखील पाठवता यावेत, यासाठी सोशल मीडियावर स्टिकर्स अपलोड करण्यात येतात. ग्रीटिंग कार्ड, म्युझिकल ग्रीटिंग, कॉफी कप, टेडीबेअर, चॉकलेट, फोटो फ्रेम, की-चेन्स, ब्रेसलेट, अंगठ्या, घड्याळे, बॅग आदी गिफ्टची खरेदी अधिक होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
“हार्ट’च्या आकाराच्या केकला पसंती…
“व्हॅलेटाइन डे’चे “सेलिब्रेशन’ केक कापून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने “हार्ट’च्या आकाराचे आकर्षक केक बाजारात दाखल आहेत. अनेक केकच्या दुकानांनी “व्हॅलेटाइन वीक’निमित्त विशेष केक महोत्सवांचे नियोजन केले आहे. याशिवाय आवडत्या व्यक्तीचा फोटो असणारे केकला देखील मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. या खास दिवशी केकवर मिळणाऱ्या विशेष सवलती “चेरी ऑन द केक’ ठरत आहेत.