पेशावर – पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण ताजे असताना आता भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या एका महिलेचे “तसेच’ प्रकरण पुढे आले आहे. फेसबुकवरील मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेलेल्या अंजू या महिलेने पाकिस्तानमधील मित्राबरोबर निकाह केला असून तिने इस्लाम धर्म स्विकारला आहे. निकाहनंतर तिचे नाव आता फातिमा झाले आहे.
दोन मुलांची आई असलेली 34 वर्षीय अंजू खैबर पख्तुन्वामधील अप्पर दिर जिल्ह्यातल्या 29 वर्षीय नसरुल्लाह या मित्राच्या घरी रहात होती. ते दोघेही 2019 मध्ये फेसबुकवरून मित्र झाले होते. कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये स्थानिक जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये त्यांनी परस्परांशी निकाह केला. अंजूने इस्लाम धर्म स्विकारल्यानंतर या दोघांचा विधीवत निकाह लावून देण्यात आला, असे अप्पर दिर जिल्ह्यातील मोहरर शहराच्या पोलीस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी मुहम्मद वहाब यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
हे दोघेही नसुरुल्लाहचे कुटुंबिय, पोलीस आणि वकिलांसमवेत अप्पर दिर येथील न्यायालयामध्ये हजर झाले होते. अंजूचे धर्मांतर झाले. तिचे नाव फातिमा ठेवण्यात आले आणि त्यानंतर या दोघांचा निकाह झाल्याच्या वृत्ताला मलाकांद विभागीय पोलीस उप महासंचालक नासीर मेहमूद सत्ती यांनी दुजोरा दिला आहे. नंतर या दोघांना पोलिसांच्या सुरक्षेत घरी पाठवून देण्यात आले. आपण स्वतः राजीखुशीने पाकिस्तानमध्ये आल्याचे अंजूने मान्य केले आहे. तिने निकाहनाम्यावर स्वाक्षरी देखील केली आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नसरुल्लाह हा विज्ञानाचा पदवीधर असून पाच भावंडांमध्या सर्वात धाकटा आहे. अंजूबरोबर आपले प्रेमसंबंध नाहीत आणि अंजू 20 ऑगस्टला ती भारतात परत जाईल, असे प्रतिज्ञापत्र त्याने स्थानिक अधिकाऱ्यांसमोर सादर केले होते. मात्र या कालावधीत अंजूला नुसरुल्लाबरोबर राहण्याची परवानगी दिली गेली होती.
कुटुंबियांना त्रास देऊ नका…
अंजूचा जन्म उत्तर प्रदेशातील कैलोर गावात झाला आहे. राजस्थानातील अलवार जिल्ह्यातल्या अरविंद नावाच्या व्यक्तीशी तिचा विवाह झाला असून या दाम्पत्याला 15 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा मुलगाही आहे. जयपूरला जाते असे सांगून ती गुरुवारी निघून गेली होती. मात्र नंतर ती पाकिस्तानमध्ये गेल्याचे आपल्याला समजल्याचे अरविंद यांनी सांगितले. भारतीय पासपोर्टच्या आधारे ती अटारी वाघा सीमेवरून पाकिस्तानमध्ये गेली. तिला केवळ अप्पर दिर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये 30 दिवसांचा व्हिसा मंजूर करण्यात आला आहे.
तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये “पाकिस्तानमध्ये सुरक्षित वाटते आहे.’ असे तिने म्हटले आहे. कायदेशीरपणे पाकिस्तानमध्ये आले आहे. मी काही दोन दिवसांसाठी आणि अचानक पाकिस्तानमध्ये आलेली नाही. माझ्या कुटुंबियांना आणि मुलांना त्रास देऊ नका, अशी प्रसिद्धी माध्यमांना विनंती करत असल्याचेही तिने आपल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हटले आहे.
दरम्यान, अंजू आणि नसरुल्लाह यांचा एक व्हिडीओ शूट समोर आले आहे.
उधर पाकिस्तान के ख़ैबरपख़्तूनख्वा पहुँची अंजू का नसरुल्लाह के साथ वीडियो शूट जारी है… pic.twitter.com/chimkbvBae
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) July 25, 2023