पुणे : पुण्यात पुन्हा एकदा संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती घडली आहे. एका PMPML बस चालकाने 10 ते 15 वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडवरची ही दुर्घटना आहे. या PMPML बस चालकाच्या विरोधात पुण्यातील चतु:श्रुंगी पोलिसांमध्ये 308 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश सावंत असे या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. PMPML चालकाचा एका चालकाशी वाद झाला होता. त्याचा राग अनावर झाल्याने वाहकाने थेट वाहनांना उडवलं आहे. दारूच्या नशेत चालकाने उलटी पीएमटी बस चालवल्याचा आरोपही केला जात आहे. यावेळी बसमध्ये 50 प्रवासी प्रवास करत होते. या घटनेदरम्यान बसमधील प्रवासी घाबरलेले दिसले. तसेच मदतीसाठी विनवणी करत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले.
नेमकं काय घडलं ?
चालक निलेश ज्ञानेश्वर सावंत कोथरूड डेपोची भाडेतत्त्वावरील बस क्रमांक TT 33मार्ग क्रमांक 276/13 ही बस एनडीए गेट ते चिंचवड येथे घेऊन जात होता. त्यादरम्यान रत्ना हॉस्पिटल येथे वेडीवाकडी बस चालवल्याने एका कारला बस घासून गेली. याबाबत कार चालकाने पुढील चौकात विचारणा केली असता त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. याचा राग अनावर झाल्याने बस चालकाने भर चौकात रस्त्यावरील वाहनांचा कोणताही विचार न करता बस अचानक चौकातून पाठीमागे रिव्हर्स घेतली आणि वाहने उडवली. त्यानंतर बस पुन्हा पुढे चौकापर्यंत नेली.
यावेळी प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलिसांनी चालकास बससह चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये नेले आणि ड्रायव्हरला अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंदविला.