नाशिक – महायुतीत अजूनही काही जागांवरून तिढा कायम आहे. नाशिक लोकसभेबाबत महायुतीत आधीच शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. आता मनसे भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने नाशिक लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. (A new twist in Nashik Lok Sabha elections)
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत मनसेकडून तीन जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याचे वृत्त आहे. यात दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मनसेची भाजपसोबत युती झाल्यास नाशिकची जागा मनसेला सुटल्यास महायुतीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नाशिक येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे हेच नाशिक लोकसभेचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. आता मनसेच्या एन्ट्रीमुळे स्थानिक पातळीवर डोकेदुखी वाढली. यावर चर्चा सुरु असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यामुळे नाशिकमधील जागावाटपाचा तिढा महायुती कसा सोडविणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.