अमरावती – धामणगाव तालुक्यातील निंभोरा राज येथील चंद्रभागा नदी पात्रात तीन मुलांसह आईचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. एकादशीनिमित्त पूजा केलेले साहित्य नदीत अर्पण करण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली. यावेळी त्या चौघांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत.
यश चवरे (13), जीवन चवरे (14), सोहम (12) पुष्पा चवरे अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, निंभोरा येथील पुष्पा चवरे यांनी आज एकादशी निमित्त पूजा केली. यानंतर हे पूजेचे साहित्य पाण्यात अर्पण करण्याकरीता त्या मुलांसोबत गावाशेजारच्या नदीवर गेल्या. यावेळी तिन्ही मुले अंघोळीसाठी नदी पात्रात उतरली.
मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्याच्या मुख्य प्रवाहात गेली. त्यांना वाचविण्यासाठी पुष्पा चवरे यांनी देखील नदी पात्रात उडी घेती. मात्र त्यांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी उभ्या असलेल्या इतर दोन महिलांनी या चौघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले.
यामध्ये त्या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. यातील एका महिलेला अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर अन्य एका महिलेवर धामणगाव रेल्वे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.