67 वर्षांपूर्वी प्रभात : सोमवार, ता. 28 माहे सप्टेंबर सन 1953

संयुक्‍त महाराष्ट्राच्या वाटाघाटी यशस्वी 

नागपूर, ता. 27 – मुंबई, मध्यप्रदेश आणि हैदराबाद राज्यांतील मराठी भाषिक प्रदेशांचे बरेच पुढारी संयुक्‍त महाराष्ट्रासंबंधी चर्चा करण्यासाठी येथे जमले आहेत. त्यांनी संयुक्‍त महाराष्ट्राच्या निर्मितीसंबंधी केलेल्या वाटाघाटी समाधानकारकरीत्या संपत आलेल्या असून बहुतेक साऱ्या विवाद्य प्रश्‍नावर त्यांचे एकमत झाल्याचे अत्यंत विश्‍वसनीय वृत्त आलेले आहे.

संयुक्‍त महाराष्ट्राच्या निर्मितीसंबंधी आणखी तपशीलवार चर्चा करण्यासाठी मध्यप्रदेशचे विकासमंत्री श्री. रा. कृ. पाटील यांच्या निवासस्थानी सर्व मंडळींची आज मध्यरात्रीपर्यंत एक सभाही झाली.
महत्त्वाचे निर्णय या सभेत घेण्यात आलेले संयुक्‍त महाराष्ट्रासंबंधीचे सर्वसंमत निर्णय आणि मंजूर झालेला ठराव लवकरच नेमण्यात यावयाच्या भाषावार राज्य निर्मिती समितीपुढे ठेवण्यात येणार आहे.

राजकीय गोटात कानोसा घेता असे समजते की, या वाटाघाटीतून बऱ्याच नव्या व सूचक घडामोडी घडण्याचा संभंव आहे. त्या घडामोडींमुळे संयुक्‍त महाराष्ट्राच्या रचनेवर बरेच दुरगामी परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

नव्या आंध्र भाषिक राज्याला संयुक्‍त महाराष्ट्राच्या शुभेच्छा 

पुणे, ता. 27 – ऑक्‍टोबर 1 रोजी नव्या आंध्र राज्याची सुरुवात होणार असून आज संयुक्‍त महाराष्ट्र परिषदेच्या वतीने आंध्र राज्याला यश चिंतन करणारा शुभेच्छा संदेश पाठविण्यात आला.

सरहद्द समितीचे स्वागत भाषावार प्रदेशाची रचना करण्यासाठी हिंद सरकार लवकरच व्यापक अधिकार असलेली एक सरहद्द समिती नेमणार आहे, त्या समितीचेही या ठरावात स्वागत करण्यात आले आहे. या समितीला व्यापक चौकशी करण्याचे अधिकार द्यावे व भाषिक तत्त्वावर घटक राज्यांची पूनर्रचना करण्याचे ध्येय समितीने डोळ्यांपुढे ठेवावे, अशी सूचनाही या ठरावाद्वारे हिंदुस्थान सरकारला करण्यात आलेली आहे.

एकमुखी मागणी.. 

सर्व मराठी भाषिक प्रदेशांचा एकच एक मराठीचा घटक प्रदेश निर्माण करावा, अशी संयुक्‍त महाराष्ट्राच्या साऱ्या कैवाऱ्यांनी एकमुखी मागणी करावी, अशी ठरावात विनंती करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.