Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची सध्या राज्यभरात युवा संघर्ष यात्रा सुरू झाली आहे. याद्वारे ते अनेक जिल्ह्यात सरकारविरुद्ध आवाज उठवत आहेत. याद्वारे अनेक लोकांची भेट घेत सर्वसामान्य जनतेशी ते संवाद साधत आहे. या यात्रेदरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी एक ट्वीट करत राज्य सरकारवर टीका केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी इतिहासाचा दाखला देत मराठेशाहीचा उल्लेख करत सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. रोहित यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन युवा संघर्ष यात्रेचा उल्लेख करत कोणाचेही नाव न घेता अनाजी पंत म्हणत सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधला. रोहित पवार यांनी ट्वीट करत लिहीले की, “युवा संघर्ष यात्रेत साडे चारशे किमी पायी चालल्यानंतर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पूर्वीच्या काळात मराठेशाही एका ‘अनाजी पंत’ ने संपवली आताच्या काळामध्ये ‘महाराष्ट्र-धर्म’ संपवण्याचे काम एक आधुनिक ‘अनाजी पंत’ करत आहेत,” असे म्हणत रोहित पवार यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
#युवा_संघर्ष यात्रेत साडे चारशे किमी पायी चालल्यानंतर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पूर्वीच्या काळात मराठेशाही एका ‘अनाजी पंत’ ने संपवली आताच्या काळामध्ये ‘महाराष्ट्र-धर्म’ संपवण्याचे काम एक आधुनिक ‘अनाजी पंत’ करत आहेत.#अनाजी_पंत#YuvaSangharshYatra#KaGappaMaharashtra…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 28, 2023
दरम्यान, राज्यात एकीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत वाद सुरू असतानाच रोहित पवार यांनी केलेले ट्वीट चर्चेत आले आहे. मात्र आमदार पवार यांच्या ट्विटला भाजप आणि फडणवीस समर्थकांनी प्रत्युत्तर देत तुम्ही आजोबांच्या पाऊलावर पाऊल टाकत जातीय राजकारण करत आहात, असे म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अनाजी पंत असा उल्लेख केला होता. त्यानंतर आता रोहित पवार यांनीही आधुनिक अनाजी पंत असा उल्लेख आपल्या पोस्टमध्ये केला आहे. मात्र यामध्ये त्यांनी स्पष्टपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतलेले नाही.