पाईपद्वारे गॅस वितरणामुळे गृहिणींची मोठी सोय- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर  –  पाईप लाईनद्वारे सर्व सामान्यांना आता गॅस मिळणार आहे. या प्रकल्पामुळे सर्व सामान्यांचे जीवन सुसह्य होणार असून विशेष: गृहिणींची मोठी सोय होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

शिरोळी एमआयडीसीमध्ये शहर गॅस वितरण (सीजीडी) गॅस पाईप लाईन प्रकल्पासाठी पाईप लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री श्री. पाटील आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, गेली अनेक वर्षे चर्चेत असणारा आणि गृहिणींना गॅसची चिंतामुक्त करणारा हा प्रकल्प कोल्हापूरमध्ये सुरु होत आहे. या प्रकल्पामुळे वाहनांच्या इंधन खर्चावरील किंमत निम्यावर येईल. त्याचबरोबरच प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. ‘मनी सेव इज मनी अर्न’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे सर्व सामान्यांचे जीवन सुसह्य होणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपणा सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत, असेही ते म्हणाले.

शाहूंची कर्मभूमी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या विकासात मरगळ निर्माण झाली होती. पण सध्या आम्ही विकासाचे वळण लावले आहे, असे सांगून खासदार श्री. छत्रपती पुढे म्हणाले, दाभोळवरुन बेंगलोरपर्यंत गॅस पाईप लाईन गेली आहे. त्याची आऊटलेट कोल्हापूरला मिळावी यासाठी मी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धमैंद्र प्रधान यांना भेटून मागणी केली. ही मागणी श्री. प्रधान यांनी तात्काळ मान्य करुन तशा सूचना दिल्या. पाईप लाईनद्वारे गॅस वितरण प्रकल्पासाठी पाईप लाईन टाकण्याचा आज शुभारंभ होत आहे. 38 हजार कनेक्शन युध्दपातळीवर देण्यासाठी येणाऱ्या सर्व अडचणी पूर्ण सोडवू, असे अश्वासनही त्यांनी दिले.

एचपी ऑईल गॅस प्रा.लि. चे प्रकल्प प्रमुख सुनील सदमाके यांनी सुरुवातीला स्वागत प्रास्ताविक करुन या प्रकल्पाची माहिती दिली. मौजे वडगाव येथे या प्रकल्पाचे मुख्य ठिकाण करण्यात येणार असून येथून स्टिल पाईपद्वारे कोल्हापूर, इचलकरंजी येथील एमआयडीसीमध्ये उप ठिकाण करण्यात येणार आहे. त्यानंतर एमडीपी पाईप लाईनद्वारे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास शिरोळी एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष राजू पाटील, गेल इंडियाचे उप महाप्रबंधक पी. राजकुमार, व्यवस्थापक हेमंत कुमार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.