हडपसर (विवेकानंद काटमोरे) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी डॉक्टर ,नर्स ,पोलीस यांसह अत्यावश्यक सेवेतील सर्व योद्धे आपली सेवा बजावत आहेत. यातील महत्त्वाचा घटक म्हणजे रुग्णवाहिका अर्थात अॅम्ब्युलन्स चालक. गेल्या वर्षभरापासून अॅम्ब्युलन्सचालक आपलं कर्तव्य चोख बजावत आहेत. रुग्णांना रुग्णालयापर्यंत आणणे आणि उपचारानंतर त्यांना घरापर्यंत सोडणे हे महत्त्वाचं काम अॅम्ब्युलन्सचालक करत आहेत.
हडपसर येथील एक अॅम्ब्युलन्सचालकही हे काम नित्यनियमाने करत आहेच, पण त्यांनी सामाजिक भानही जपलं आहे. आपल्या तीन रुग्णवाहिका रुग्णांना सेवा देण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. हम्पलींग भद्रे असं या रुग्णवाहिका मालक व चालकाचं नाव आहे. हडपसर येथे त्यांची जीवन रक्षा ही रुग्णवाहिका सेवा देणारी फर्म आहे.त्यातील त्यांनी तीन रुग्णवाहिका रुग्णांना मोफत सेवा देण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. दिनांक 23 एप्रिल ते 23 मे पर्यंत 20 किलोमीटर अंतरावर ही मोफत सेवा असणार आहे. या तीनही रुग्णवाहिका विना ऑक्सीजनच्या असणार आहेत. गेल्या वर्षीही कोरोनारुग्णांची ने-आण करुन हम्पलींग भद्रे यांनी आपलं कर्तव्य तर बजावलंच,परंतु यावर्षीही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
गेली 18 ते 20 वर्ष हडपसर भागात मी रुग्णवाहिका सेवा करत आहे. माझ्या रुग्णवाहिकेतून ये- जा करणारे रुग्ण स्वतःच
भाडे ठरवतात. कोरोना काळात मी अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना जवळून अनुभवत आहे. त्यांना आपणही काही मदत करू शकतो केवळ याच भावनेतून मी माझ्या तीन रुग्णवाहिका रुग्णांना मोफत सेवा देण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.23 एप्रिल ते 23 मे पर्यंत मला 9822032967 या क्रमांकावर संपर्क साधून ही सेवा घेऊ शकतात. असे आवाहन
जीवन रक्षा रुग्णवाहिका मालक व चालकअसलेले हम्पलींग भद्रे यांनी केले आहे.