कीव्ह : रशिया आणि युक्रेनच्या युद्धात अनेक निष्पाप लोकांचा बळी जात असल्याचे दिसत आहे. दोन्ही देशाकडून हल्ले-प्रतिहल्ले अजूनही सुरूच आहेत. त्यात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, या युद्धात एका नऊ वर्षाच्या चिमुरडीचा मायेचा हात हिरावला गेला. तिची आई या युद्धात मरण पावली. मृत्युमुखी झालेल्या आईला या निरागस मुलीने एक पत्र लिहिले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
आपल्या मृत आईला लिहीलेल्या पत्रात भविष्यात आपण चांगली व्यक्त बनण्याचे वचन चिमुकलीने दिले आहे. तसेच तिने स्वर्गात आपली भेट होईल असेही म्हटले आहे. युक्रेनमधील बोरोदियांका येथे राहणाऱ्या गलिया या नऊ वर्षीय मुलीने रशियन हल्ल्यात तिची आई मारली गेल्यानंतर हे पत्र लिहिले आहे.
गलियाने आईला तिच्या आयुष्यातील सुंदर नऊ वर्ष दिल्यासाठी आभारही मानले आहेत. युक्रेनच्या अंतर्गत व्यवहार मंत्र्यांचे सल्लागार अँटोन गेराश्चेन्को यांनी या पत्राचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी या ट्वीटला कॅप्शन देत सांगितले, ‘नऊ वर्षांच्या मुलीने बोरोदियांका येथे मरण पावलेल्या तिच्या आईला पत्र लिहीलं आहे.’
गलियाने आपल्या मृत आईला लिहीलेल्या पत्रात लिहीलं आहे की, ‘आई! तू संपूर्ण जगातील सर्वोत्तम आई आहेस. मी तुला कधीच विसरणार नाही. स्वर्गात आनंदी राहा. मी एक चांगली व्यक्ती होण्यासाठी आणि स्वर्गात जाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन. आपण स्वर्गात भेटू! गलिया.’