नगर – बनावट टेस्ट रिपोर्टवरून आता महापालिकेच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य बाळासाहेब कर्डिले यांनी महापालिका आयुक्तांना लेखी पत्र दिले असून महापालिकेकडे उपलब्ध झालेले बनावट टेस्ट रिपोर्टच्या छायांकित प्रति तंत्रनिकेतन महाविद्यालयास देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या बनावट टेस्ट रिपोर्टची तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या चौकशीपूर्वीच आता तंत्रनिकेतन तपासणी करणार असल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी शहर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोर रस्ते घोटाळा प्रकरणातील बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरणी महाविद्यालयाच्या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली
यानंतर कॉंग्रेस शिष्टमंडळाने महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब कर्डिले यांची भेट घेत गुन्हे दाखल करण्यासाठीचा मागणी तक्रार अर्ज दिला. यावेळी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतरच तंत्रनिकेतनने महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी कॉंग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, दशरथ शिंदे, सांस्कृतिक कॉंग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, कामगार नेते विलास उबाळे, युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे उपस्थित होते.
शासकीय तंत्रनिकेतनने महापालिकेकडे सादर झालेल्या बनावट रिपोर्टची माहिती मागवली असल्याची माहिती यावेळी प्राचार्यांनी कॉंग्रेस शिष्टमंडळाला दिली आहे. तसे लेखी पत्र मनपा आयुक्त व मनपा सार्वजनिक बांधकाम विभाग शहर अभियंत्यांना देण्यात आले आहे. तक्रार अर्जाच्या प्रती महामहीम राज्यपाल रमेश भैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे राज्य आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, टेस्ट रिपोर्ट बनावट असल्याची तक्रार काका शिंदे यांनी केल्यानंतर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी अतिरिक्त आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहे. हे आदेश मिळाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त रजेवर गेले. त्यामुळे चौकशी ठप्प आहे. आता तंत्रनिकेतनने बनावट टेस्ट रिपोर्ट मागितल्याने त्याची आता तपासणी होणार असून त्यात दोषींवर कारवाई देखील तंत्रनिकेतनकडून होणार आहे.