पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मागील पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपला ६६ हजार २६७ मताधिक्य मिळाले होते, तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांत भाजपने विजयाची हॅट्ट्रिक केली असून, याच मतदासंघात भाजप नगरसेवकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पर्वती मतदारसंघात भाजपला आपले मताधिक्य कायम राखण्याचे आव्हान असून, काँग्रेस पक्षाला येथे आघाडी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये वडगाव शेरी, पर्वती, कोथरूड, कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे छावणी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघातून सर्वाधिक मताची आघाडी मिळाली होती. त्यात पर्वती मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पर्वती मतदारसंघाची मते ही निर्णायकी ठरणार आहेत. त्यादृष्टीने या मतदारसंघात सर्व पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
मागील विधानसभेत पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ ६६ हजार मताधिक्यांनी निवडून आल्या होत्या. याच भागातून महापालिका निवडणुकीतही शहरातून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. पर्वती मतदारसंघातील सात प्रभागांतील 27 पैकी 23 नगरसेवक भाजपचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, तर काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे.
या पार्श्वभूमीवर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पर्वतीतून भाजपला मताधिक्य मिळणार का, हेच पाहावे लागेल. त्याचबरोबर या मतदारसंघात काँग्रेससह अन्य पक्षांना आघाडी मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे मतदार कुणाला कौल देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मतदानाचा टक्का निर्णायक
सन २०१४ लोकसभा निवडणुकीत पर्वती मतदारसंघात 54.85 टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये ५२.०७ टक्के मतदानाची नोंद झाली. अर्थात गेल्या निवडणुकीत मतदानात 2.78 टक्क्यांनी घट झाली होती. या मतदारसंघात मोठमोठ्या सोसायटी, व्यापारी व झोपडपट्टीवासीय असा संमिश्र समावेश आहे. त्यामुळे या मतदारसंघात सोसायटी व उपनगर परिसरातून मतदानाची टक्केवारी वाढली, तर त्याचा निकालावर परिणाम होणार आहे.
पर्वती मतदारसंघात येणारा भाग
संपूर्ण बिबवेवाडी, सॅलीसबरी पार्क, मार्केडयार्ड, गंगाधाम, सहकारनगर, अरण्येश्वर, पर्वती दर्शन, शिवदर्शन, मुकुंदनगर, महर्षीनगर, इंदिरानगर, जनता वसाहत, गुलटेकडी, हिंगणे व पु. ल. देशपांडे आणि दांडेकर पुलाचा काही भाग, शिवतेजनगर, चव्हाणनगर.
मागील लोकसभेसाठी पर्वती मतदारसंघात
पडलेली मते :
एकूण मतदान : १ लाख ९३ हजार ३१०
गिरीश बापट : १ लाख १६ हजार ८९९
मोहन जोशी : ५० हजार ५६७
वंचित आघाडी : १० हजार ६९९
पर्वती मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या
पुरुष : २ लाख, २१ हजार ८६८
महिला : १ लाख ९४ हजार ९६१
अन्य : ११
एकूण : ४ लाख १६ हजार ८४०