लखनौ – बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये तुलसियानी ग्रुपच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांसह दोन अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, गौरी खान ही तुलसियानी ग्रुपची ब्रॅंड ऍम्बेसेडर आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 फेब्रुवारी रोजी लखनौमधील सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशनमध्ये गौरीसह मुंबईतील व्यापारी किरीट जसवंत यांनी तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार तुलसियानी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नंतर कंपनीचे संचालक महेश तुलसियानी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जसवंतचा आरोप आहे की गौरी खान तुलसियानी ग्रुपची ब्रॅंड ऍम्बेसेडर आहे आणि तिने केलेल्या जाहिरातीवर विश्वास ठेवून त्याने 2015 मध्ये लखनौमधील तुलसियानी ग्रुपच्या एका प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक केला होता. जसवंत यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी फ्लॅट बुक करण्यासाठी तुलसियानी ग्रुपला 85 लाख 46 हजार रुपये दिले होते, तरीही कंपनीने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही.
कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल तुलसियानी आणि संचालक महेश तुलसियानी यांनी पैसे परत मागण्यासाठी विविध सबबी सांगायला सुरुवात केल्याचा आरोप जसवंत यांनी केला.
जसवंत सांगतात की, सन 2017 मध्ये कंपनीने वेगवेगळ्या तारखांना एकूण 22 लाख 70 हजार रुपये नुकसानभरपाई दिली आणि सहा महिन्यांत ताबा न दिल्यास कंपनी व्याजासह संपूर्ण रक्कम परत करेल, असे सांगितले. मात्र, आपल्याला ना ताबा मिळाला, ना रक्कम मिळाली, असे जसवंत यांनी सांगितले. ज्या फ्लॅटसाठी फ्लॅटच्या विक्रीचा करार करण्यात आला होता, तो करारही दुसऱ्या व्यक्तीसोबत केल्याचे नंतर कळले, असे त्यांनी सांगितले.