बदलीच्या ठिकाणी हजर व्हा, अन्यथा सेवा खंडित: महसूलमंत्री विखे पाटील

राहाता – बदली झालेल्या ठिकाणी हजर न होणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर आता कारवाई करून त्यांची सेवा खंडीत करण्याचा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, महसूल विभागातील बदल्यांची प्रक्रिया केव्हाच संपली आहे. त्यामुळे बदली झालेल्या ठिकाणी अनेक अधिकारी अद्याप हजर होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याची गंभीर दखल घेतली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील 70 टक्के जागा यापूर्वी रिक्त होत्या. त्या सर्व जागांवर आता अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. परंतु, काही ठिकाणी अधिकारी हजर होत नसल्याने अशा अधिकाऱ्यांना आता निलंबनाच्या नोटिसा देण्यात आल्या असून, त्यांच्या विभागीय चौकशा आणि सेवा खंडीत करण्याचा निर्णयही वेळप्रसंगी विभागाला घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
राहुरी तालुक्यातील उंबरे येथील घटना अतिशय गंभीर असून, याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिले आहेत. याबाबतीतील संपूर्ण माहिती पुढे आणण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, यापूर्वी श्रीरामपूर तालुक्यात अशाच घटना घडल्या होत्या, त्यावेळी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. उंबरे येथील घटना पाहता ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत, अशा घटना घडतील तेथील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. परंतु समाजातील जबाबदार घटकांनीही पुढे येऊन अशा प्रवृत्तीबद्दल माहिती देण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.





