खालापूर – मांढरदेवीवरून दर्शन घेऊन ठाण्याकडे जाताना खंडाळा घाटातील वळणावर निखिल काळे हा चार वर्षीय मुलगा रस्त्यावर पडला. रविवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. तब्बल ८० किलोमीटरचे अंतर कापून घरी गेल्यावर मुलगा हरविल्याचे त्यांच्या लक्षात आले.
निखिल त्याच्या पालकांसोबत मांढरदेवी येथे दर्शनासाठी गेला होता. खंडाळा घाटातील एका वळणावर निखिल रिक्षातून खाली पडला. मात्र ही बाब कोणाचेही लक्षात आली नाही. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या ट्रकचे चालक लक्ष्मण जाधव यांना घाटात रडत असलेला मुलगा आढळून आला. त्यांनी ट्रक थांबवून त्याची विचारपूस केली. पण भेदरलेल्या निखिलला काही सांगता आले नाही.
त्यामुळे त्याला खोपोली पोलीस ठाण्यात नेले. यावेळी खोपोली पोलिसांनी निखिलबाबत सोशल मीडियावर संदेश आणि फोटो प्रसारित केले. याच दरम्यान, ठाणे येथे पोचलेल्या निखिलच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली होती. यावेळी समाजमाध्यमातील संदेशांमुळे निखिल खोपोली पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पालकांनी खोपोली येथून निखिलला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे ट्रक चालक लक्ष्मण यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.