जाधववाडी – पिंपरी चिंचवड महापालिकेने मागील काही महिन्यांपूर्वी क्रीडाधोरणात बदल केले आहेत. त्यात जलतरण तलावाच्या नियमावलीत व तिकिटामध्ये बदल केल्याने जलतरण प्रेमींमध्ये नाराजी आहे. या ध्येयधोरणात बदल करण्याची मागणी स्विमिंग कोच सुनील ननवरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.
ननवरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने शहरातील क्रीडा धोरणात काही बदल केले आहेत. परंतु नवीन बदलामुळे क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळण्यापेक्षा खच्चीकरण होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी शहरातील 13 जलतरण तलावांवर वर्षभर नियमित येणार सभासद व जलतरण प्रेमींना सोयीस्कर ठरतील अशी नियमात शिथिलता आणावी.
माजी सैनिक ऑनलाइन तलाव बुकिंग करताना शहरातील दिव्यांग व्यक्ती, राज्यस्तरीय, राष्ट्रीय खेळाडू, जलतरण प्रशिक्षणासाठी योगदान देणारे खेळाडू यांना बुकिंगमध्ये पन्नास टक्के सवलत पूर्वी होती. ती द्यावी. वास्तविक खेळाडू शहराचे नाव लौकिकात भर घालत असतो. विविध स्तरावर प्रावीण्य दाखविल्यानंतर सरावासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठीच सवलतीचा वापर होत असतो. त्यामुळे खेळाडूची नक्कीच खेळातील वाटचाल सोईची होऊन शहराचे, राज्याचे, देशाचे नाव उज्ज्वल होते. त्यामुळेच पूर्वी धोरणत लागू केलेली ही सवलत पुन्हा लागू करावी.
जलतरण तलावाचे तिकीट व पास दरवाढ ही भरमसाठ होऊ नये. सध्या नियमित दर व त्रैमासिक पास दर समानच आहे. तसेच वार्षीक पास पद्धतही ऑफ सिझन हिवाळा व पावसाळा विचार करता माफक असावी. उन्हाळी प्रशिक्षण शिबिरासाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठीची दरवाढ तीनपट करणे योग्य नाही. त्यात त्यांना सुट द्यावी. अशी मागणी ननवरे यांनी केली आहे.