सुबोध शिर्के
विडणी – विडणी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादीच्या गेल्या 25 वर्षाच्या सत्तेला सुरुंग देत भाजपचा थेट सरपंच निवडून आल्या राष्ट्रवादीच्या राजेगटाला मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण फलटण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या विडणी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी, भाजप, आम आदमी व अपक्ष अशी थेट सरपंचपदासाठी चौरंगी लढत झाली. मात्र, खरी लढत ही राष्ट्रवादी व भाजप यांच्यामध्येच पाह्याला मिळाली. ही निवडणूक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व भाजप खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्या प्रतिष्ठेची बनली होती.
यामुळे या ग्रामपंचायतीच्या प्रचारसभेत रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, भाजप आमदार जयकुमार गोरे यांनीही एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. या निवडणूकीत राष्ट्रवादीचे व भाजपाचे वरिष्ठ नेत्यांनी सहभाग घेतल्याने ही निवडणूक अत्यंत अटीतटीची व प्रतिष्ठेची बनली होती. मात्र या निवडणूकीत गेल्या 25 वर्षांची सताधारी असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या सत्तेला सुरुंग देत थेट सरपंचपदाची माळ भाजपप्रणित विडणी विकास आघाडीच्या सागर कांतीलाल अभंग यांच्या गळ्यामधे पडली आहे.
या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीकडून थेट सरपंचपदासाठी सुरेश विठ्ठल नाळे, भाजपप्रणीत विडणी विकास आघाडीतून सागर कांतीलाल अभंग, आम आदमी पक्षाच्या वतीने अनिकेत किसन नाळे व अपक्ष विठ्ठल सोनबा पवार यांच्यामध्ये चौरंगी लढत झाली. यामध्ये सागर अभंग ( भाजप) यांना 3122 मते मिळाली तर सुरेश नाळे यांना 2842 मते मिळाली. यामध्ये 280 मतांची आघाडी घेऊन सागर अभंग विजयी झाले. या निवडणुकीत सदस्य पदाच्या उमेदवारांमध्ये विडणी विकास आघाडीचे 4 तर राष्ट्रवादीचे 13 उमेदवार निवडून आल्याने सदस्यपदी राष्ट्रवादीने बहुमत मिळवले असले तरी गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे.
सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे सुनिल अब्दागिरे, सचिन अब्दागिरे, सौ. गौरी जाधव, संदीप गुजले, सुशांत जगताप, सौ. नम्रता निकाळजे, अविनाश अभंग, सौ. शुभांगी काळखे, सौ. शिला वाघमारे, हनुमंत भोसले, रामदास पवार, सौ. धनश्री इंगळे, सौ.राणी अभंग या राष्ट्रवादीच्या 13 जण विजयी झाले आहेत तर सौ. जयश्री शिंदे, सचिन अभंग, सौ. लता अभंग, सौ. मनिषा नाळे या विडणी विकास आघाडीच्या चार जणांनी विजय मिळवला आहे.