सातारा – राज्यात करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज साताऱ्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला. कॅलिफोर्नियावरुन आलेल्या 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला. 14 दिवसांपूर्वी संबंधित व्यक्तीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
साताऱ्यात मृत्यू झालेल्या रुग्णाचे 14 व्या दिवशीचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. त्यानंतर या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत जिल्हा प्रशासनाने अजून अधिकृत घोषणा केली नाही.
दरम्यान, सातारा जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदा दाखल केलेल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांचे पहिल्या १४ दिवसाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आज 15 व्या दिवसासाठीचे त्या रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणी साठी पाठविले जातील, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.