कानपूर : किशोरवयीन मुलीचा 2018 मध्ये विनयभंग करणाऱ्या जमावाने केलेल्या मारहाणीत त्या मुलीच्या आईचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला.
या किशोरवयीन मुलीचा सहा जणांनी 2018मध्ये विनयभंग केला होता. गेल्या आठवड्यात ही मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना या सहा जणांनी घरात घुसून मारहाण केली होती. या सहा पैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
अबिद मिंटू, महबूब, चांद बाबू, जमील आणि फिरोझ अशी या चार आरोपींची नावे आहेत. या सर्व जणांना 2018 मध्ये अटक केली होती. मात्र स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात हे सहा जण या मुलीच्या घरात शिरले. त्यांनी विनयभंगाची फिर्याद मागे घ्यावी म्हणून दमदाटी करण्यास सुरवात केली. जेंव्हा कुटुंबियांनी नकार दिला. त्यावेळी या सहा जणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यापैकी या मुलीच्या आईचा मृत्यू झाला. अन्य एका महिलेवर उपचार सुरू आहेत.