लासुर्णे (वार्ताहर): इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जंक्शन (ता. इंदापूर) येथील 30 वर्षीय युवकास करोनाची बाधा झाली आहे. हा युवक मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कर्करोगाच्या उपचारासाठी ये-जा करत होता.
यावेळी तो उपचारासाठी गेला असता मुंबईत करोना तपासणी करण्यात आली, त्यामुळे त्याला करोना असल्याचे गुरुवारी (दि. 25) निष्पन्न झाले. त्याच्यावर टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रशासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून जंक्शन व लासुर्णे परिसर पुर्णपणे सील करण्यात आला आहे.
लासुर्णे प्राथमिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. संबंधित युवकाच्या संपर्कातील पाच जणांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. कुटुंबातील चौघे जण व मुंबईला ने आण करणाऱ्या वाहन चालकाचे घशाचे नमुने घेण्यात आले आहेत, अशी माहिती लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवन सरतापे यांनी दिली .