शिक्रापूर -येथील वेळ नदीवरील बंधाऱ्यावर दुपारच्या सुमारास सणसवाडी येथून पोहण्यासाठी आलेल्या तेरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या मुलाचा शोध घेतला असता मिळून आलेला नाही; परंतु सायंकाळी उशिरापर्यंत पाण्यात बुडालेल्या मुलाचा शोध सुरुच होता.
अमर राधाकिसन तायड (रा. सणसवाडी) असे बुडालेल्याचे नाव आहे. वेळ नदीवरील बंधाऱ्यावर दुपारच्या सुमारास काही मित्रांसमवेत तो पोहण्यासाठी आलेला होता. पोहताना अचानक पाण्यात बुडाला त्यावेळी त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिक व काही युवक धावत आले. अमर हा पाण्यात बुडाला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी शिक्रापूर पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, हवालदार संजय ढावरे, प्रताप कांबळे, मनोहर पुंडे, आनंद कुंभार यांसह स्थानिक नागरिक कृष्णाजी विरोळे पाटील, पप्पू पवार, तुषार आळंदीकर, यांसह आदींनी वेळ नदीच्या बंधाऱ्यावर धाव घेतली आणि नागरिकांच्या मदतीने पाण्यामध्ये शोध घेण्याचे ठरविले. सुमारे दोन ते तीन तास पाण्यात बुडालेल्या अमरचा शोध घेतला; परंतु मिळून आला नाही. शिक्रापूर पोलिसांनी रांजणगावसह पुणे येथे अग्निशामक दलास संपर्क साधला; परंतु कोणत्याही ठिकाणहून मदत मिळू शकली नाही. शिरूर तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असता, ते त्यांचे पथक पाठवून देत असल्याचे सांगितले.
- उपनिरीक्षक दिवटे यांनी मारली पाण्यात उडी
शिक्रापूर वेळ नदीपात्रात तेरा वर्षाचा मुलगा बुडाल्यानंतर अनेक युवक त्या ठिकाणी उपस्थित होते; मात्र पाण्यात बुडालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी कोणी पुढे येत नसताना शिक्रापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी स्वतः पाण्यात उडी मारली आणि त्यानंतर लगेचच काही युवकांनी पाण्यात उतरत शोध कार्य सुरु केले.