शिरूर तालुक्यातील धामारी येथील खळबळजनक घटना
शिक्रापूर-येथे कामासाठी आल्यानंतर धामारी (ता. शिरूर) येथील महिलेची येथीलच एका युवकाकडून छेडछाड झाली. या टेंशनमधून महिलेने विषारी औषध प्राशन केले असल्याची घटना घडली. याप्रकरणी युवकावर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष बाळासाहेब सासवडे (रा. बजरंगवाडी, शिक्रापूर) असे या तरुणाचे नाव आहे. धामारी येथील या पाडित महिलेची ओळख संतोष सासवडे सोबत झालेली होती. ही महिला 11 ऑगस्ट रोजी कामावरून घरी जात असताना संतोष सासवडे हा त्याच्या ताब्यातील एका कारमधून तेथे आला व त्याने या महिलेला आपण फिरायला जाऊ मी तुला घरी सोडतो, असे वाईट हेतूने म्हणाला. महिलेने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. काही वेळातच संतोष हा त्या महिलेजवळ गेला आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यातून महिलेला जास्त टेंशन आले. तिने रात्रीच्या सुमारास घरी विषारी औषध प्राशन केले. त्रास होऊ लागल्याने तिला शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी सदर रुग्णालयात जाऊन विचारपूस केली असताना वरील प्रकार उघडकीस आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे हे करीत आहेत.