मॉस्को – फ्रान्स आणि सौदी अरेबियानंतर रशियाही एका हल्ल्याने हादरुन गेला आहे. एका माथेफिरू तरुणाने एका पोलिसावर चाकू हल्ला केला.
या तरुणाने पोलिसाच्या पाठीवर तीन वेळा वार केल्याने पोलीस गंभीर जखमी झाला आहे. हा दहशतवादी हल्लाच असल्याचे रशियाने म्हटले आहे.
या आधी सौदी अरेबियातही फ्रान्सच्या उच्चायुक्तालयाबाहेर गार्डवर चाकू हल्ला करण्यात आला होता.
रशियातील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर तरुण हा चाकू आणि पेट्रोल बॉम्ब घेऊनच वावरत होता.
ही घटना रशियातल्या कुक्मोर या शहरात घडली आहे. हा मुस्लिम बहुल भाग असून या भागात फ्रान्स विरुद्ध निदर्शनेही झाली होती.
तरुण हा पोलिसांवर पाळत ठेवून होता. त्याने पाठीमागून येत त्या पोलिसावर वार केले. त्याच वेळी त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने हल्लेखोर तरुणावर गोळ्या झाडल्या. त्यात हा तरुण ठार झाला.
हा हल्ला करण्याच्या आधी त्याने “अल्लाहू अकबर’ अशा घोषणा देत पोलिसांना काफीर असे म्हटल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.