नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने शुक्रवारी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते कमल नाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द केला. निवडणूक आचारसंहितेचा वारंवार भंग करत असल्याचा ठपका ठेवत आयोगाने ती कारवाई केली.
मध्यप्रदेशात सध्या विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठीच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण तापले आहे. प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग केला जात असल्याच्या विविध तक्रारी समोर येत आहेत.
अशातच नाथ यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणुकीच्या काळात स्टार प्रचारकावरील खर्च संबंधित पक्षाच्या खात्यात जमा होतो. मात्र, तो दर्जा गमावल्याने नाथ यांनी प्रचारावेळी केलेला प्रवास, मुक्काम आदींवरील खर्चाचा भार कॉंग्रेसच्या उमेदवाराला उचलावा लागणार आहे.
म्हणजेच, तो खर्च उमेदवाराच्या नावे जमा होईल. नाथ यांच्याविरोधात भाजपकडून आचारसंहिता भंगाच्या विविध तक्रारी देण्यात आल्या. एका उल्लेखामुळे नाथ काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यांनी भाजपच्या उमेदवार असलेल्या एका महिला मंत्र्याचा उल्लेख आयटम म्हणून केला होता.