पुणे(प्रतिनिधी) :- करोनाचा फटका कोजागिरी पौर्णिमेच्या दुधाच्या मागणीला बसला आहे. सर्वत्र साधेपणाने सण साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे दुधाला मागणी कमी आहे. गणेश पेठेतील दूध भट्टीतील होणाऱ्या उलाढालीवर त्याचा परिमाण झाला आहे.
दरवर्षी गणेश पेठ येथील घाऊक बाजारात दुधाची मोठी विक्री होत असते. ग्रामीण भागातून येथे दूध विक्रीस येते. यंदाच्या वर्षी करोनामुळे सार्वजनिक मंडळे, सोसायट्यांकडून सार्वजनिक स्वरुपात कोजागिरी पौर्णिमा साजरा करण्यात येणार नाही. त्यामुळे दुधाला गेल्या वर्षी एवढी मागणी नाही तसेच दुधाला अपेक्षेएवढा भाव मिळाला नाही, असे गणेश पेठ दूधभट्टीतील प्रमुख व्यापारी दामोदर उर्फ तात्या हिंगमिरे यांनी सांगितले.
ते म्हणाले, गेल्या वर्षी 18 लिटर दुधाच्या घागरीला 1300 रुपये असा भाव मिळाला होता. एक लिटर दुधाची विक्री 70 रुपये दराने झाली होती. यंदाच्या वर्षी दुधाला मागणी कमी असल्याने घागरीला 1100 ते 1150 असा भाव मिळाला असून एक लिटर दुधाची विक्री 55 ते 60 रुपये भावाने होत आहे.