औरंगाबाद – सुमारे 20 पानी सुसाइट नोट लिहून तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादयक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. साहेबराव नामदेव देशटवाड (वय-28, राहणार – टीव्ही सेटर चौक, औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सुसाइट नोटमध्ये मित्र, मैत्रिण, पोलीस उपनिरिक्षक, तहसीलदार यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी छळ केला व मित्र मैत्रिणींनी ब्लॅकमेल केल्याचे सुसाइट नोट मध्ये लिहिलेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत साहेबराव यांचे वडील पैठण येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांच्यावर रेशनकार्ड संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये एकूण पाच आरोपी आहेत, त्यामध्ये दोन तहसीलदारांचा समावेश आहे. गेल्या वर्षी या प्रकरणात देशवटवाड यांना निलंबित करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास पैठण पोलीस करत आहेत. 12 सप्टेंबरला पैठण ठाण्यातील फौजदार दोन कर्मचाऱ्यांसह देशवटवाड यांच्या घरी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच मृताच्या आईला बाथरूममधून हाथ धरून बाहेर ओढले, असा आरोप करण्यात आला आहे.
मृत साहेबराव याचे एका तरूणीसोबत संबंध होते. ती तरूणी मित्राच्या सहाय्याने मृत तरूणाला वारंवार पैशाची मागणी करत ब्लॅकमेल करत होती. तरूणीने मृत्याच्या खात्यातूनही सर्व रक्कम काढून घेतली होती. या विवंचनेतून मृत साहेबरावने एका डायरीत 20 पानी सुसाइट नोट लिहिली आहे. त्यात तीन ते चार मित्रांची नावं, ज्या तरूणीसोबत संबंध होते तिचे नाव, पैठण पोलीस ठाण्यातील एका फौजदाराचे नाव आणि वडिलांसोबत गुन्ह्यात असलेल्या तहसिलदाराच्या नावाचा सुसाइट नोटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
साहेबराव याने आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुटुंबीयांकडून सुसाइट नोट मध्ये उल्लेख असलेल्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच जोपर्यंत त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याचे मृताचे वडिल देशटवाड यांनी सांगितले आहे.