टाकवे बुद्रुक – आंदर मावळ आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या टाकवे गावात भरणारा आठवडे बाजार करोनामुळे बंद करण्यात आला होता. अखेर राज्य सरकारने दिलेल्या परवानगीनंतर आठ महिन्यांपासून बंद असलेला बाजार सोमवारी (दि. 24) सुरू होणार असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
आंदर मावळातील नागरिकांना भौगोलिक दृष्टीने सर्वात जवळची बाजारपेठ टाकवे बुद्रुक येथील आहे. नागरिकांनची भाजीपाला खरेदीसाठी कामशेत, वडगाव, तळेगाव या ठिकाणी धाव घ्यावी लागत असत नागरिकांनची होणारी गैरसोय लक्षात घेऊन टाकवे ग्रामपंचायतीकडून आठ वर्षांपासून बाजार भरविण्यात येत आहे.
करोनामुळे आठवडे बाजार बंद असल्याने भाजीपाला विक्रेत्यांकडून नागरिकांची सर्रास लूट होत असल्याने टाकवे येथील बाजार सुरू करावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चा वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली होती. अखेरीस प्रशासनाने करोना पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमाचे पालन करत बाजार भरविण्यास परवानगी दिली आहे. सर्व दुकानदारांना दहा फुटाचे अंतर ठेवून दुकाने मांडावी तसेच मास्कचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे .
येत्या सोमवारपासून राज्य सरकारच्या परवानगीनुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमानुसार टाकवे येथील आठवडे बाजार भरविण्यात येणार आहे. गावातील मुख्य बाजारपेठ रस्त्यावर भरविण्यात येणार असून संबंधित व्यापाऱ्यांना त्यादृष्टिने सूचना करण्यात आल्या आहेत.
– सुभाष बांगर, ग्रामविकास अधिकारी, टाकवे बुद्रुक