पुणे – पुणे शहरातील अलंकार पोलीस ठाण्यातील तपास पथकाच्या (डीबी) खोली मधून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय गणेश चव्हाण (वय 19, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन मनोहर बुधावले यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय चव्हाण यांच्याविरोधात अलंकार पोलिस ठाण्यामध्ये बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचाराचा(पॉस्को) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात त्याला पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली होती. त्याला गुरुवारी रात्री बुधावले यांच्या ताब्यात दिले होते. त्याला त्यांनी तपास पथकाच्या खोलीमध्ये ठेवले होते. त्यावेळी बुधावले हे कर्तव्यावर असताना आज पहाटेच्या सुमारास त्यांना डोळा लागल्याचे पाहून आरोपीने पलायन केले.
काही वेळानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो तिथून नसल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत.