पुणे – शहर आणि परिसरात सोमवारी पहाटेपासून जोरदार पावसाला सुरवात झाली. पण, सकाळी आठ वाजल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. ही विश्रांती दिवसभर कायम होती. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवत होता. तर पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
सिंहगड रस्ता, पाषाण, कोथरुड, कात्रज या भागात पहाटेपासून जोरदार पावसाला सुरवात झाली. पण, सकाळी आठ वाजल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. ही विश्रांती दिवसभर कायम होती. त्यामुळे शिवाजीनगर येथे सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये 2.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
लोहगाव येथील वेधशाळेत 3.2 तर, पाषाणमध्ये 2.5 मिलीमीटर पाऊस पडला, अशी नोंद हवामान विभागाने नोंदविली आहे.
दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तेथूनही बाष्प महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये पुण्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने वर्तविली आहे.