नवीन 252 रुग्ण दाखल : 609 रुग्णांना डिस्चार्ज, 16 रुग्णांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 84 हजारांचा टप्पा पार केला आहे. शहरातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी तुलनेने मृतांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात शहरातील 1441 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेताना मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 566 इतकी आहे. गेल्या 24 तासांमध्ये 16 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सोमवारी चार वाजेपर्यंत शहरातील 246 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 6 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 24 तासांमध्ये 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 9 व शहराबाहेरील 7 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 84,031 रुग्णांची नोंद झाली आहे.
शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 2975 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 421 रुग्णांचाही समावेश आहे.
सोमवारी दिवसभरात शहरात 16 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील भोसरी, मोशी, चिंचवड, दिघी, वाकड, पिंपळे गुरव, अजमेरा, घरकुल येथील 9 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील तळेगाव, पिंपळगाव, चाकण, बदलापूर, देहूगाव, खेड येथील 7 रुग्णांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 609 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 78,758 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2359 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 894 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.