सेऊल (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियने आपल्या पूर्वीच्या निःशस्त्रीकरणाच्या कटिबद्धतेचे पालन करावे, असे आवाहन दक्षिण कोरियाने आज केले. उत्तर कोरियाच्या लष्करी संचलनादरम्यान लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला सादर करण्यात आले होते. त्यामुळे दक्षिण कोरियाने चिंताही व्यक्त केली आहे.
उत्तर कोरियातील सत्तारुढ पक्षच्या 75 व्या स्थापना दिनानिमित्त राजधानी प्योंगयांगमध्ये झालेल्या लष्करी संचलनादरम्यान विविध आधुनिक शस्त्रास्रांचे सार्वजनिक प्रदर्शन घडवण्यात अले होते. त्यामध्ये आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचाही समावेश होता. हे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाच्या आतापर्यंत ज्ञात असलेल्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांमधील सर्वात मोठे आणि सर्वाधिक लांब पल्ल्याची क्षमता असल्याचे मानले जाते आहे. तसेच जगभरातील अन्य देशांकडील आधुनिक आवृत्तीच्या क्षेपणास्त्रांपैकी सर्वात आधुनिक आणि पाणबुडीवरूनही डागता येऊ शकेल, असे आहे.
हे क्षेपणास्त्र म्हणजे विकसित केल्या जात असलेल्या क्षेपणास्त्रांची प्रतिकृती असावी, असा काही तज्ञांचा अंदाज आहे. मात्र हे क्षेपणास्त्र प्रदर्शित करण्यामागील उत्तर कोरियाचा हेतू शक्तीप्रदर्शन करणे आहे, हे उघड आहे. त्याच बरोबर उत्तर कोरिया अजूनही घातक शस्त्रे विकसित करत असून त्या घातक शस्त्रांची क्षमता वाढवण्याचा खटाटोप अजूनही सुरूच आहे, हे देखील स्पष्ट आहे. अमेरिकेबरोबर झालेल्या चर्चेनंतरही ही शस्त्रलालसा उत्तर कोरियाने सुरूच ठेवली आहे.
उत्तर कोरियाकडे असलेल्या नवीन लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे अनावरण केल्याबद्दल दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी चिंता व्यक्त केली. उत्तर कोरियाला 2018 मधील कराराचे पालन करण्याची मागणी दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या एका निवेदनामध्ये करण्यात आली आहे. शस्त्रांचे प्रमाण कमी करण्याची हमी या करारात उत्तर कोरियाने दिली होती.
कोरियन द्वीपकल्पात अण्वस्त्रसज्जतेत कपात करून आणि शांतता मिळविण्याच्या पूर्वीची वचनबद्धता पाळण्यासाठी पुन्हा चर्चा आवश्यक आहे, असेही दक्षिण कोरियाच्या पररष्ट्र मंत्रालयाने एका अन्य निवेदनात म्हटले आहे.
दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची एक आपत्कालिन बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये उत्तर कोरियाच्या शनिवारी प्रदर्शित केलेल्या शस्त्रांच्या घातक क्षमतेचे विश्लेषण तज्ञांकडून केले जाईल आणि दक्षिण कोरियाच्या संरक्षण क्षमतेचा आढावाही घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
उत्तर कोरिया आणि अमेरिकेदरम्यानच्या आण्विक निःशस्त्रीकरणासंदर्भातील चर्चेत खंड पडल्यापासून उत्तर आणि दक्षिण दोन्ही कोरियामधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. जर आपल्याला धमकावले गेले तर आपली अण्वस्त्र शक्ती पूर्णपणे एकत्रित केली जाईल, असा इशारा उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी लष्करी संचलनादरम्यानच्या भाषणादरम्यान दिला होता.
मात्र त्यांनी अमेरिकेवर थेट टीका करणे टाळले. उत्तर कोरियाने अण्वस्त्रांच्या चाचण्या अजून थांबवलेल्या आहेत. याचाच अर्थ किम यांना अजूनही अमेरिकेबरोबरच्या चर्चेत स्वारस्य आहे, असेच समजले जात आहे.
मात्र नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीनंतर या चाचण्या लगेच सुरू केल्या जाऊ शकतात. अमेरिकेच्या नवीन नेतृत्वाबरोबर वाटाघाटी करताना आपली बाजू भक्कम करण्याचा हा प्रयत्न असेल, असेही काही तज्ञांचे मत आहे.