पुणे – करोना बाधितांची संख्या वाढत असतानाही काही नागरिकांना अजूनही या परिस्थितीचे गांभीर्य नाही. मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांवर शहरात तसेच ग्रामीण भागात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नगरपालिका, पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून आतापर्यंत मास्क न घालता फिरणाऱ्या 1 लाख 79 हजार 704 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 3 कोटी 56 लाख 30 हजार 736 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आता कारवाई करण्यात येत आहे. करोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांकडून तसेच कोणताही नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकतांना आढळणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई सुरु आहे.
नगरपालिका हद्दीमध्ये मास्क न घालता फिरणाऱ्या 44 हजार 130 व्यक्तींविरुध्द कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 49 लाख 47 हजार 854 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्या 1 हजार 6 जणांविरुध्द कारवाई करून त्यांच्याकडून 1 कोटी 93लाख 42 हजार 882 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तर, ग्रामपंचायातींकडून 29 हजार 112 नागरिकांवर कारवाई करून 1 कोटी 13 लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.