764 नवीन बाधितांची भर : 17 रुग्णांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 78 हजारांचा टप्पा पार केला आहे. शहरामध्ये आजपर्यंत 78,081 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 1807 जणांचा मृत्यू झाला असून आज 764 नवीन रुग्णांची भर पडली आहे. सलग चौथ्या दिवशी करोनाबाधितांचा आकडा एक हजाराहून कमी झाला आहे.
बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 764 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर सलग पाच दिवस शहराबाहेरील एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तसेच 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 12 व शहराबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत शहरात 78,081 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 5440 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 881 रुग्णांचाही समावेश आहे.
आज दिवसभरात 827 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 69,888 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2990 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 2988 अहवाल प्रलंबित आहेत.