सातारा – करोनाबाधित रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या उपचारांच्या देयकाबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी येत होत्या. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश काढून नेमणूक केलेल्या पथकांकडून करोनाबाधितांवरील उपचारांच्या देयकांची तपासणी केली. त्यात 122 देयके अवाजवी असल्याचे निदर्शनास आले. या रुग्णांना आकारण्यात आलेली 33 लाख 94 हजार 856 रुपये जास्तीची रक्कम रुग्णांच्या कुटुंबीयांना परत देण्यात आली आहेत.
कोविड- 19 बाधित रुग्णांवरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून वाजवीपेक्षा जास्त देयक घेतली जात असल्याच्या अनेक तक्रार येत आहेत. त्यामुळे या देयकांची तपासणी करण्यासाठी पथके व नोडल अधिकाऱ्याची नेमणूक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली आहे. जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन घरी गेलेल्या 122 करोनाबाधित रुग्णांकडून 96 लाख 10 हजार 770 रुपये आकारण्यात आले होते.
त्यापैकी 122 बाधितांच्या देयकांमध्ये तब्बल 33 लाख 94 हजार 856 रुपये जादा आकारण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या पथकांनी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे देयकांमधून ही रक्कम कमी करून त बाधितांना परत करण्याचा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला.
करोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने विविध खासगी रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचार करण्याची व्यवस्था केली आहे. या रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी देयके शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे आहेत का, याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सिंह यांनी एका आदेशाद्वारे पथके तयार करून प्रत्येक पथकात नोडल अधिकारी व ऑडिटरची नेमणूक केली आहे. यापुढेही करोनाबाधितांवरील उपचारांच्या देयकांची तपासणी या पथकांकडून वेळोवेळी करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.