पुणे – करोना काळात ऑक्सिजनचे “ब्लॅकमार्केटिंग’ थांबवावे, अशी मागणी करत आम आदमी पार्टीने केली आहे. शिवाय रुग्णांसाठी ऑक्सिजन वापराबाबत काढलेल्या परिपत्रकाचा फेरविचार करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
आरोग्य सचिवांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील सर्व रुग्णालयांतील ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्यात येणार आहे. वॉर्ड पातळीवरील रुग्णाला 7 लिटर प्रति मिनिट आणि अतिदक्षता विभागातील रुग्णाला 12 लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन वापराचे निकष देण्यात आले आहेत. या परिपत्रकामुळे डॉक्टर संघटनांसह आता अन्य संघटनांनीदेखील या परिपत्रकाला विरोध केला आहे. त्यामुळे सरकार आणि संघटनांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
ऑक्सिजनचा तुटवडा आणि रुग्णांसाठीच्या ऑक्सिजन वाटपाचे मोजमाप होणार असल्याने करोना बाधितांसह नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वॉर्डासह अतिदक्षता विभागातील बाधितांना वैद्यकीय गरजेनुसार आवश्यक तेवढा ऑक्सिजन उपलब्ध करून दिला जावा. त्यावर नियंत्रण नसावे. ऑक्सिजन पातळी खालावलेल्या व केवळ गंभीर रुग्णांनाच सरकारी अथवा खाजगी रुग्णालयात भरती करावे, अशी भूमिका पक्षाचे राज्य प्रवक्ता डॉ. अभिजित मोरे यांनी मांडली आहे.