नाशिक – नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या कामासंबंधातील मूलभूत बाबींची चर्चा करण्याच्या हेतूने आज जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांचा जाणीवपूर्वक आढावा घेतला.
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे शाश्वत, परिणामकारक नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील छोट्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गोदावरी खोऱ्यातील प्रकल्पांचे पाणी नाशिक, नगरसह जायकवाडीपर्यंत मुबलक तसेच सातत्यपूर्ण प्रवाहात राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
जिथे शक्य आहे तिथे पाणी वळवण्यसाठीच्या शक्यता तपासून त्याप्रमाणे आखणी करण्यात येईल. तसेच लहान व पटकन पूर्ण होणारे प्रकल्प तात्काळ पूर्णत्वासाठी नेले जातील त्यासाठी निधीची तरतूदही केली जाईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.