लेण्याद्री सेंटरचे प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, दोन कर्मचारी बाधित
नारायणगाव (पुणे)- जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री कोविड सेंटरचे प्रमुख, वैद्यकीय अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे दिली.
लेण्याद्री कोविड सेंटर सुरू झाल्यापासून मढ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे सातत्याने सेंटरमध्ये कार्यरत आहेत. रुग्णांना सुविधा मिळण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.
दरम्यान, तालुक्यात आरोग्य विभागातील 12 कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत. त्यात आता कोविड सेंटरमधील प्रमुख, डॉक्टर, कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. आधीच मदतीसाठी तोडके हात त्यात त्यांना करोनाची लागण होत असल्याने इतर अधिकारी, कर्माचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. तरी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क परिधान करावे तसेच शासनाने ठरवून दिलेलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन डॉ. गोडे यांनी केले आहे.